ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 1 - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिजनोरमधील चंदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझम खान यांनी भारतीय लष्कराच्या जवानांवर बलात्काराचा आरोप करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "आझम खान यांच्याविरोधात कलम 124 अ, 131 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या अनिल पांडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे", अशी माहिती चंदपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अजय कुमार सिंग यांनी दिली आहे.
आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली होती. त्यांनी सदर पोलीस ठाण्यातही तक्रार केली होती. दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे शहाजहाँपूरमधील जिल्हा समन्वयक राजेश कुमार अवस्ती यांनी आझम खान यांची जीभ आणणाऱ्याला 50 लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
"महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन जात आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे". आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत होते.
मी भाजपाची आयटम गर्ल आहे, ते इतर कोणाबद्दल बोलत नाहीत. त्यांनी सर्व लक्ष माझ्यावर केंद्रीत करुनच उत्तरप्रदेशात निवडणूक लढवल्या असं आझम खान बोलले होते. स्पष्टीकरण देताना आझम खान म्हणाले की, मीडियाने माझ्या विधानांचा विपर्यास करुन चुकीचा अर्थ लावला. माझ्यामुळे लष्कराच्या मनोधैर्य कसे खचू शकते? पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेले तेव्हा लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम झाला.
याआधीही केली आहेत वादग्रस्त वक्तव्य -
आझम खान यांनी अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ताज्या घटनेबद्दल बोलायचं झाल्यास बुलंदशहर सामूहिक बलात्कारावर त्यांनी केलेलं वक्तव्य. या सामूहिक बलात्काराला त्यांनी एक राजकीय षडयंत्र म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांच्या या वक्तव्याचं उत्तर मागितलं, तेव्हा मात्र आपल्या वक्तव्याच्या विपर्यास केल्याची पळवाट त्यांनी काढली. नंतर त्यांनी विनाअट माफीदेखील मागितली. न्यायालयाने त्यांचा हा माफीनामा स्विकार केला होता.
आझम खान यांच्या वक्तव्याच्या समाचार घेताना स्वामी म्हणाले, "आझम खानसारख्या लोकांना चर्चेत राहायचे असते. असे लोक मुस्लिम समाजालाही फसवत असतात. आझम खान नेहमीच अशी वाह्यात वक्तवे करत असतात. त्यांना भारतात ज्या प्रकारच्या लोकशाहीची मजा घेता येते तशी कुठल्या मुस्लिम देशात घेता आली नसती. त्यांनी कुठल्याही मुस्लिम देशात असे वक्तव्य केले असते तर त्यांचा शिरच्छेद केला गेला असता, किंवा त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्यात आले असते."
पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं होतं. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं होतं. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं होतं. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.