नवी दिल्ली – जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती(Mehboba Mufti) शनिवारी तालिबानच्या बहाण्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या लोकांशी संवाद साधायला हवं असं आवाहन त्यांनी केले. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा देण्यात यावा. तालिबानने अमेरिकेला पळवलं, आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका. ज्यादिवशी सहनशीलता संपेल त्यादिवशी तुम्हीही राहणार नाही असं मेहबूबा मुफ्ती यांनी इशारा दिला आहे.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, जर केंद्र सरकारला जम्मू काश्मीरात शांती हवी असेल तर त्यांनी जम्मू काश्मीरात कलम ३७० पुन्हा लागू करावं. संवादाच्या माध्यमातून काश्मीरवर तोडगा निघू शकतो. अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानींनी(Taliban) अमेरिकेला पळण्यास भाग पाडलं परंतु तालिबानींची वर्तवणूक संपूर्ण जग पाहत आहे. मी तालिबानींना आवाहन करते की असं कुठलंही कृत्य करू नका जेणेकरून जग तुमच्याविरोधात जाईल असं त्यांनी सांगितले.
तसेच तालिबानींनी बंदुकीची भूमिका संपवायला हवी. अफगाणिस्तानच्या लोकांशी तालिबानी कशारितीने वागत आहेत त्याकडे जगातील प्रत्येक देशाचं लक्ष आहे. १९४७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांनी जम्मू काश्मीरच्या नेतृत्वाला आश्वासन दिलं होतं की, येथील स्थानिक लोकांची आम्ही पूर्णपणे सुरक्षितेची काळजी घेऊ. या राज्याला विशेष दर्जा देऊ. जर स्वातंत्र्यावेळी भाजपा सरकार सत्तेत असतं तर जम्मू काश्मीर भारताचा भाग नसतं असा दावा पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
भाजपाचा मेहबूबा मुफ्तींवर निशाणा
तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांनी पीडीपी नेता मेहबूबा मुफ्ती यांच्यावर विधानावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भारत हे मजबूत राष्ट्र आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ना ज्यो बायडन. आम्ही सगळे दहशतवाद्यांना संपवायचं प्रयत्न करत आहोत. मेहबूबा मुफ्ती या देशद्रोही आहेत. त्यांनी जम्मू काश्मीरच्या लोकांचा अपमान केला आहे. मेहबूबा मुफ्ती काश्मीरात तालिबानची सत्ता आणू पाहते. परंतु आमचं सरकार दहशतवाद्यांना पूर्णपणे संपवेल असा टोला त्यांनी लगावला आहे.