ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर पुन्हा नव्या जोमाने उभं राहण्याचा प्रयत्न करणा-या काँग्रेस पक्षाी धुरा थोड्याच काळात राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र असं असलं तरी काँग्रेसच्या माजी नेत्या व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या त्यांची नात प्रियांका गांधींकडे आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून पाहत होत्या, असा गौप्यस्फोट गांधी परिवाराचे निकटवर्तीय व काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम. एल. फोतेदार यांनी केला आहे. प्रियांका यांच्यातील कौशल्य पाहता भविष्यात त्या मोठ्या नेता बनून नावाजली जाईल असा विश्वास इंदिरा गांधींनी व्यक्त केला होता, असेही फोतेदार यांनी म्हटले आहे.
गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या फोतेदार यांचे 'चिनार लिफ्स' हे पुस्तक येत्या ३० ऑक्टोबर प्रकाशित होणार असून त्यात त्यांनी गांधी घराण्यांसंबंधी अनेक गुपितं उघड केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना फोतेदार यांनी इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या दिवसातील काही आठवणींना उजाळा देत इंदिराजी प्रियांका यांनाच आपली राजकीय वारसदार म्हणून बघत होत्या, असे फोतेदार यांनी नमूद केले
इंदिरा गांधी यांची हत्या होण्यापूर्वी ( ३१ ऑक्टोबर १९८४) काही दिवस आधीच इंदिराजी काश्मीरला गेल्या होत्या. तिथे त्यांनी एक मशीद व मंदिराला भेट दिली. तेथून विश्रांतीगृहाच्या दिशेने जात असताना इंदिरा गांधी विचारात गढलेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी
आपल्याशी प्रियांका यांच्याबाबत सविस्तर चर्चा केली. प्रियांकामध्ये मी स्वत:ला पाहते, तिच्याकडे येत्या काळातील नेता बनण्याची क्षमता आहे असे सांगत प्रियांकाने राजकारणात यावे अशी इच्छआ त्यांनी व्यक्त केली होती, असे फोतेदार यांनी सांगितले.
इंदिराजींच्या या मताबद्दल मी राजीव गांधींना तसेच पत्र लिहून सोनिया गांधीनाही सांगितले होते असेही फोतेदार यांनी नमूद केले.