मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर रिल्स बनवणाऱ्यांचा मोठ्या प्रमामावर सुळसुळाट झाला आहे. या रिल्स बनवण्याच्या नादात अनेक दुर्घटना झाल्याच्या बातम्याही येत असतात. तसेच बहुतांश रिल्समध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील अंगविक्षेप केले जातात. दरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक रामगोपाल यादव यांनी आज राज्यसभेमध्ये इन्स्टाग्राम रिल्सचा मुद्दा उपस्थित केला.
रिल्स बनवून ते सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर संतप्त झालेले रामगोपाल यादव म्हणाले की, हे लोक असे कपडे परिधान करतात की जे पाहून मान शरमेनं खाली जाते. कुठल्याही समाजामध्ये न्यूडिटी आणि अल्कोहलिझम वाढला की अनेक संस्कृती नष्ट होतात. सरकारने हे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत, अशी मागणी रामगोपाल यादव यांनी केली. तसेच त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला जनसंघाच्या काळातील सभ्यता आणि संस्कृतीच्या संरक्षणाच्या घोषणेचीही आठवण करून दिली.
रामगोपाल यादव म्हणाले की, आमच्या काळामध्ये इंग्रजी सहावीच्या वर्गापासून शिकवली जात असे. मुलं थोडी भाषा शिकले की, त्यांना सांगितलं जायचं की, कॅरॅक्टर इज लॉस, एव्हरीथिंग लॉस. आज परिस्थिती अशी आहे की, काही प्लॅटफॉर्म अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत. मी इथे इन्स्टाग्रामचा विशेष उल्लेख करेन. एका अंदाजानुसार आमच्या देशातील तरुण दररोज सरासरी तीन तास इन्स्टाग्रामवर रिल्स आणि टुकार मालिका पाहण्यामध्ये वेळ घालवत आहेत.
एकत्र बसल्याने, सोबत जेवल्याने कुटुंबामध्ये जे प्रेम निर्माण होतं, ते आज राहिलेलं नाही. लोक सोबत बसून राहतात, पण फोनमध्ये गुंतलेले असतात. दररोज बातम्या येतात की, इन्स्टाग्रामवर मैत्री झाली, लग्नानंतर तरुणाने तरुणीची हत्या केलीय, अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यावेळी प्रा. यादव यांनी ऑनलाइन क्लासचाही उल्लेख केला. तसेच सरकारने न्यूडिटी आणि अल्कोहोलिझमला प्रोत्साहन देणाऱ्या प्लॅटफॉर्मविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.