दहावीची परीक्षा ही बोर्ड परीक्षा आहे, तुमच्या आयुष्याचा पाया म्हणजे १० वीची परीक्षा. त्यामुळे, या परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवा, या परीक्षेत नापास झालात, कमी गुण मिळाले तर तुम्हाला जीवनात यशस्वी होता येणार नाही, अशी धारणा सर्वसाधारण समाजात दिसून येते. मात्र, एका परिक्षेची मार्कलिस्ट तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही, हे वाक्य खरं करुन दाखवलंय एक आयएएस अधिकाऱ्याने. आयएएस तुषार डी सुमेरा यांची इयत्ता दहावीची गुणपत्रिका पाहिल्यास तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण, इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांत त्यांना मिळालेले गुण पाहता त्यांना सरकारी नोकरी मिळेल, असे कुणालाही वाटत नाही. मात्र, आज ते आयएएस अधिकारी आहेत.
गुजरातच्या भरूच जिल्ह्यात पोस्टवर असलेले तुषार डी सुमेरा यांची १० वी गुणपत्रिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. कारण, सध्या जिल्हाधिकारी असेलल्या तुषार यांना १०वीच्या परीक्षेत इंग्रजीत १०० पैकी ३५, गणितात ३६ आणि विज्ञानात ३८ गुण मिळाले होते. या निकालामुळे कुटुंबीयांसह, गावकऱ्यांनाही माझ्याकडून कुठलीही अपेक्षा नव्हती. मी आयुष्यात काही करू शकेल, असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र, १० वी नंतर १२ वी आर्ट आणि बीएचं शिक्षण घेऊन तुषार यांनी बीएड पूर्ण केलं. त्यानंतर, सहायक शिक्षक म्हणून नोकरी करताना त्यांनी युपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. आपल्या सातत्य प्रयत्नाने आणि अभ्यासपूर्ण मेहनतीने त्यांनी २०१२ साली युपीएससी परीक्षा क्रॅक करत आयएएस पदाला गवसणी घातली.
तुषार यांची ही सत्यकथा किंवा त्यांचा हा प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तसेच, एका पराभवाने खचून न जाता किंवा कमी मार्क पडले म्हणून निराश न होता. येणाऱ्या परिस्थितीत सर्वकाही बेस्ट केल्यास नक्कीच यश तुम्हाला मिळेल, असा सांगणारा आहे. दरम्यान, अधिकारी अवनिश शरण यांनी ट्विटरवरुन तुषार सुमेरा यांची प्रेरणादायी कथा शेअर केली आहे.