नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचला असतानाच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी केली आहे. सात टप्प्यांपैकी सहा टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता सातवं आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान होणार आहे. ज्यात वाराणसी, गोरखपूर, आझमगड, मध्य प्रदेशमधील भोपाळ, पंजाब, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या जागांचा समावेश आहे. त्यात पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारावरून निवडणूक आयोग आणि ममता बॅनर्जी आमने-सामने आले आहेत.निवडणूक आयोग भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ममता म्हणाल्या, मोदींच्या गुरुवारी दोन रॅली आहेत. आयोगानं ज्या पद्धतीनं प्रचाराची वेळी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तो संशयास्पद आहे. खरं तर निवडणूक आयोग निष्पक्षरीत्या काम करत नाही. टीएमसीच्या तक्रारींकडे निवडणूक आयोग जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
भाजपाच्या विजयासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील, ममतांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 10:30 PM