वायनाड: वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सांगितले की, वायनाडचे प्रतिनिधीत्व मला करायला मिळाले, तर तो मोठा बहुमान असेल. माझे वडील राजीव गांधी यांच्याकरिता मी वयाच्या सतराव्या वर्षी निवडणूक प्रचारात सामील झाले होते, तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ३५ वर्षांचा मला राजकीय क्षेत्राचा अनुभव आहे, आता प्रथमच स्वतःसाठी पाठिंबा मागत आहे.
प्रियांका गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेसचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
भाजप नेते योगीश्वर काँग्रेसमध्ये दाखल
बेंगळूरू : भाजप नेते व माजी मंत्री सी. पी. योगीश्वर यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १३ नोव्हेंबर रोजी ही पोटनिवडणूक होत असून काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. योगीश्वर यांनी सोमवारी विधान परिषदेचा राजीनामा दिला होता.
उमेदवारी द्या, नाहीतर नोटाला मतदान करू
मध्य प्रदेशातील बुधनी मतदारसंघात होत असलेल्या परै निवडणुकीत माजी खासदार रमाकांत भार्गव यांच्याऐवजी भाजप नेते राजेंद्र सिंह यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. तसे न झाल्यास आम्ही नोटाला मत देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.
वायनाडला एक नाही, तर दोन खासदार : राहुल गांधी
■ राहुल गांधी म्हणाले की, प्रियांका गांधी जिंकल्या तर वायनाडमधील लोकांना एक नव्हे, तर दोन खासदार मिळणार आहेत.■ त्यामध्ये माझाही समावेश असून, मी या लोकांची बाजू संसदेत मांडत राहणार आहे. मी वायनाडचा अनौपचारिक खासदार असेन, असे राहुल गांधी यांनी नर्म विनोदी शैलीत सांगितले.■ यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी यांना रायबरेली व वायनाड येथून विजय मिळाला होता.■ त्यांनी वायनाड हा मतदारसंघ सोडल्यामुळे तिथे आता लोकसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे.