नवी दिल्ली : दिल्लीतील सीलमपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल रहमान यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याबरोबरच आमदारकीचाही राजीनामा दिल्याचे अब्दुल रहमान यांनी सांगितले. तसेच, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आपची स्थापना झाली, तेव्हा त्यात समानता आणि सर्व धर्मांना सोबत घेणे, असे अनेक गुण होते. आता आप हे करत नाही, असे अब्दुल रहमान म्हणाले. ज्यावेळी ताहिर हुसेनचा प्रश्न आला, तेव्हा आपने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले... पण जेव्हा नरेश बाल्यानचा विषय आला, तेव्हा पक्षप्रमुख (अरविंद केजरीवाल) काहीच बोलले नाहीत,असा आरोप काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अब्दुल रहमान यांनी केला.
दरम्यान, आपचे नेतृत्व आणि धोरणांमुळे मुस्लिम आणि इतर वंचित समुदायांची ज्या प्रकारे उपेक्षा झाली आहे, त्यामुळे मी जड अंत:करणाने राजीनामा देत आहे, असे म्हणत अब्दुल रहमान यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना आपला राजीनामा पाठवला आहे. अब्दुल रहमान यांनी राजीनामा पत्रात आपवर मुस्लिमांप्रती उदासीनता असल्याचा आरोपही केला आहे.
व्होट बँकेसाठी काम केल्याचा आरोपआप हा पक्ष धर्म आणि जातीच्या पलिकडे जाऊन जनतेची सेवा करेल, असे मला वाटत होते. मात्र हा पक्ष आता केवळ व्होट बँकेसाठी काम करत आहे. कोणत्याही समाजाच्या हक्काचा प्रश्न येतो, तेव्हा पक्ष मौन बाळगतो, असे अब्दुल रहमान म्हणाले. तसेच, शेवटी अब्दुल रहमान यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले की, मी सीलमपूरच्या लोकांची सेवा करत राहीन आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करत राहीन.
तिकीट न मिळाल्याने नाराजदरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत अब्दुल रहमान यांना तिकीट न मिळाल्याने ते आपच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. आपने अब्दुल रहमान यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या जागी काँग्रेसमधून आलेल्या मतीन अहमद यांचा मुलगा झुबेर अहमद यांना सीलमपूरमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अब्दुल रहमान नाराज होते.