एकीकडे पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी (सचिन) भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे भारतातूनपाकिस्तानात जाऊन अंजू नावाच्या महिलेने आपला फेसबुक फ्रेंड असलेल्या नसरुल्लाहसोबत निकाह केला आहे. अंजूने निकाहापूर्वी धर्म बदलत इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव फातिमा ठेवले आहे.
अंजूने निकाहनामाच्या प्रतिज्ञापत्रात स्वत:च्या इच्छेने इस्लाम स्वीकारल्याचे आणि नसरुल्लाला कायदेशीर पती मानत असल्याचे म्हटले आहे. यातच, एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये बोलताना अंजूच्या पाकिस्तानात जाण्यावरही भाष्य करत सीमा म्हणाली, भारत एक असा देश आहे, जेथे मनुष्य सर्वकाही करू शकतो. सीमा हैदर अवैध रित्या सीमा ओलांडून नेपाळ मार्गे भारतात आली आहे आणि एटीएस सीमाची चौकशी करत आहे.
अंजूसंदर्भात काय म्हणाली सीमा? -जेव्हा सीमा हैदरला विचारण्यात आले की, भारताची अंजू पाकिस्तानात गेली. मात्र ती सर्व कायदेशीर प्रक्रिया फॉलो करत तेथे गेली. यावर काय सांगशील? यावर सीमा म्हणाली, "ती (अंजू) भारतात राहत होती. भारत एक असा देश आहे जेथे माणूस सर्व काही करू शकतो. तर पाकिस्तान एक असा देश आहे, जेथे सीमा बाहेर गेली आहे अथवा काही करत आहे, असे कुणाला समजले असते, तर माझ्यासोबत अत्यंत वाईट झाले असते. जर हैदरला समजले असते की, मी एखाद्या हिंदू मुलासोबत प्रेम करते, तर त्याने मला मारून टाकले असते."
"सिंध आणि बलुचिस्तानात महिलांना थोडाही आदर नाही."जेव्हा सीमाला विचारण्यात आले, भारत आणि पाकिस्तानात महिलांच्या स्थितीत काय फरक जाणवतो? यावर ती म्हणाली, "सिंध आणि बलुचिस्तानात महिलांना थोडाही आदर नाही. सिंधमध्ये आमच्या वयाची एकही मुलगी शिकलेली नाही. डोक्यावरील दुपट्टा चुकून जरी खाली पडला तरी शिवीगाळ होते. तेथे अत्यंत बंधनं आहेत. घरातून बाहेर पडताना डोळ्यांपर्यंत बुरखा घालावा लागतो. तर भारतात मला खूप आदर मिळत आहे. येथील लोक फार छान आहेत. इथे महिलांप्रति अत्यंत आदर आहे.