पाकिस्तानातून सचिनच्या प्रेमात पडून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती. सीमासोबतच सचिन मीणा आणि त्याचे वडील नेत्रपाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. यूपी एटीएसने गेल्या तीन दिवसांपासून सतत चौकशी केली होती. दरम्यान, सीमा पाकिस्तानी गुप्तचर एजंट असल्याबाबतचा कोणताही ठोस पुरावा यूपी एटीएसला सापडलेला नाही. सचिनच्या घरी परतल्यानंतर ती मीडियासमोर म्हणाली की, जर मी पाकिस्तानात परत गेले तर मरून जाईन. माझा मृत्यू पाकिस्तानात निश्चित आहे. आयएसआय एजंट असल्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, मी भारतात प्रेमासाठी आले आहे. माझे सचिनवर प्रेम आहे. मी दोषी आढळल्यास जी शिक्षा होईल, ती मला मान्य आहे. सरकार मला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवू शकते, पण मुलं आणि सचिनसोबत ठेवा. मी तिथे राहायला तयार आहे.
यूपी एटीएसच्या चौकशीनंतर सीमा हैदरने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भारतीय नागरिकत्व देण्याची विनंती केली. दुबईला जाण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की कनेक्टिंग फ्लाइटमुळे मी दुबईला गेले. मी काठमांडूला निघाले होते. नेपाळमधील हॉटेल मॅनेजरने केलेल्या आरोपांवर सीमाने सांगितले की, ते खोटे बोलत आहेत. मी तिथे माझ्या नवऱ्याचे नाव सचिन असे सांगितले. सीमाने स्पष्टपणे सांगितले की, आता मी आधी हिंदू आहे. पाकिस्तानात परत पाठवल्यास तिथे माझ्या जीवाला धोका आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सीमा हैदर म्हणाली की, मी मोठ्या अडचणींसह भारतात पोहोचले आहे. एटीएसच्या चौकशीनंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सीमा म्हणाली की, भारतात प्रवेश करताना मी सीमेवर माझ्या पतीचा सचिन असा उल्लेख केला होता. आयएसआय एजंट आणि सैन्यात सहभागी असलेल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याच्या प्रश्नावरही तिने स्पष्टपणे नकार दिला. पाकिस्तानी लष्करात असलेल्या भावाशी बोलण्यास नकार देताना तिने सांगितले की, मी त्याच्याशी बोलले नाही.
सीमा हैदर 36 तासांच्या चौकशीनंतर पुन्हा प्रियकर सचिनच्या घरी रवाना झाली आहे. ग्रेटर नोएडातील रबुपुरा भागात सचिनच्या घराच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सीमा-सचिनशी कुणालाही बोलू दिलेले नाही. नेपाळमार्गे पाकिस्तानच्या सीमेवरून भारतापर्यंतच्या प्रवासाची चौकशी केली. एटीएसच्या पथकाने समोरासमोर बसून सचिन आणि सीमा यांची चौकशी केली. आता तपास यंत्रणा अशा लोकांचा शोध घेत आहे ज्यांनी सीमा हैदरला भारतात पोहोचण्यास मदत केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.