नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ३१ डिसेंबर २०१४पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या गैरमुस्लीम नागरिकांना या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर खूप खूश आहे. सीमाला आशा आहे की लवकरच ती भारताची नागरिक बनेल.
सीमाने या आनंदात लाडूही वाटले. सीमा हैदरनेही सचिन आणि मुलांसोबत व्हिडीओ बनवून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. याच दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी सीमा हैदरला सत्य सांगितलं आहे. चतुर्वेदी यांनी सीमा हैदरचा खरपूस समाचार घेतला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ठीक आहे... पण ती नेमक्या कोणत्या गोष्टीचा आनंद साजरा करत आहे? कारण ती डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेली नाही किंवा ती पाकिस्तानात छळ झालेली अल्पसंख्याक नाही" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी सिंगर मेरी मिलबेन हिच्यावरही निशाणा साधला आहे. "अमेरिकन नागरिक मेरी मिलबेन अमेरिकेत याचा आनंद साजरा करत आहेत... गजब" असंही ट्विटमध्ये म्हटलं आहे. सीएए लागू झाल्यानंतर सीमा हैदरने प्रतिक्रिया दिली आहे. "भारत सरकारने आज आपल्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला आहे. आम्ही त्याबद्दल खूप आनंदी आहोत आणि त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करतो. खरं तर मोदीजी यांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं, मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन."
"मी माझा भाऊ वकील एपी सिंह यांचे कामाबद्दल अभिनंदन करते कारण आता या कायद्यामुळे माझ्या नागरिकत्वाशी संबंधित अडथळेही दूर होतील." असं सीमाने म्हटलं आहे. तसेच 'जय श्री राम', 'राधे-राधे' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणाही दिल्या. पाकिस्तानची रहिवासी असलेली सीमा गेल्या वर्षी नेपाळमार्गे आपल्या मुलांसह भारतात पोहोचली होती. तिचा प्रियकर सचिन मीणासोबत ती सध्या भारतात राहत आहे.