पाकिस्तानमधील सीमा हैदर आणि नोएडा येथील सचिन मीणा हे नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. दोघेही सात दिवस हॉटेलमध्ये राहिले, त्यानंतर ते टॅक्सीने निघाले. सीमा आणि सचिन ज्या हॉटेलमध्ये राहिले त्या हॉटेलच्या रजिस्टरमध्ये या दोघांची कोणतीही नोंद नाही. दोघांनी नावं बदलली असावीत, असे हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
सीमा हैदरचे प्रकरण चर्चेत आले तेव्हा सीमा आणि सचिन यांनी पोलिसांना कळवलं होतं की ते दोघे काठमांडू, नेपाळमधील हॉटेल न्यू विनायक येथे 7 दिवस थांबले होते. हॉटेल रिसेप्शनिस्ट गणेश रोकमगर यांनी आज तकला सांगितले की, काठमांडूच्या या भागात अनेक हॉटेल्स आहेत, जी येथे राहणाऱ्या लोकांकडून ओळखपत्र घेत नाहीत, फक्त नाव आणि तपशील नोंदवतात. यानंतर त्यांना हॉटेलमध्ये रुम दिली जाते.
रिसेप्शनिस्ट गणेशचे म्हणणे ऐकून त्यांनी हॉटेल न्यू विनायकचे रजिस्टर तपासले असता त्यात सीमा आणि सचिनची नावं आढळून आली नाहीत, तर गणेशने स्वत: सीमा आणि सचिनची रूम बुक केल्याचं सांगितलं. हॉटेलमध्ये प्रवेश करताना सचिनने रजिस्टरमध्ये नाव बदलले असावे, असे गणेशने सांगितलं. सचिन अगोदर आला असल्याचे गणेशने सांगितले. माझी पत्नीही येणार असल्याचे सांगून रूम बुक केली.
सचिन आणि सीमाने एकत्र राहून अनेक रील केले. हॉटेलचा रिसेप्शनिस्ट गणेश म्हणाला की त्याला वाटते की, या जोडप्याने खोलीत लग्न केलं होतं. रीलमध्ये पण तेच पाहायला मिळत आहे. दोघेही पशुपतीनाथ मंदिरात जात असत. एकदा, सीमाने क्लब आणि पबमध्ये जाण्याची इच्छा देखील दर्शविली होती, परंतु हॉटेलवाल्यांनी भारतीयांची फसवणूक केली जाते सांगितल्यानंतर ती गेली नाही.
सीमा हैदर आणि सचिन मीणा हे न्यू विनायक हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट गणेशच्या कुटुंबात मिसळले. ती पाकिस्तानी असल्याचा कोणालाही संशय आला नाही. सात दिवस हॉटेलमध्ये असताना सीमाने आपण पाकिस्तानातून आल्याचे कोणालाही सांगितले नाही. हॉटेलची रुम क्रमांक 204 खूपच लहान असून ते तिथे राहायचे. सीमा आणि सचिन बहुतेक वेळ हॉटेलच्या खोलीत घालवायचे. एके दिवशी दोघेही घाईघाईने टॅक्सीने निघाले. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.