अंजू याच वर्षाच्या जुलै महिन्यात प्रियकर नसरुल्लाला भेटण्यासाठी भारतातूनपाकिस्तानात गेली होती. ती तेथे सुमारे साडेचार महिने राहिल्यानंतर, 29 नोव्हेंबरला भारतात परतली. भारतात आल्यानंतर, आपण मुलांना भेटण्यासाठी परतलो आहोत. मला त्यांची खूप आठवण येत होती. आपण तेथे स्वेच्छेने गेले होते आणि इच्छा असेपर्यंत थांबलो, असे मंजूने वारंवार म्हटले आहे. मात्र आता, आपल्याला पाकिस्तानात एवढे दिवस थांबावे लागले याचे एक मोठे कारण सीमा हैदर असल्याचेही तिने म्हटले आहे.
मुळची पाकिस्तानातील असलेली सीमा हैदर याच वर्षी भारतात आली आहे. सीमा तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी अवैधरित्या नेपाळमार्गे नोएडामध्ये आली. यानंतर तिला अटकही झाली होती. हे प्रकरण बरेच चर्चेत होते. यानंतर अंजू नावाची महिला भारतातून पाकिस्तानात गेली. सोशल मीडियावर तिचीही बरीच चर्चा झाली.
...म्हणून अंजूला पाकिस्तानातून भारतात यायला उशीर झाला -अंजू टीडब्ल्यूडब्ल्यू नावाच्या यूट्यूब चॅनलसोबत बोलताना म्हणाली, मी एक महिन्याचा व्हिसा घेऊन गेले होते. मी एक महिन्यानंतर पाकिस्तानातून परतणार होते. मात्र, सीमा हैदर प्रकरण घडले आणि वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. अनेक लोक हे कटकारस्थान असल्याचे म्हणू लागले. यामुळे मला परिस्थिती योग्य वाटली नाही आणि मी व्हिसा वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळेच मी साधारणपणे सव्वा चार महिन्यांपर्यंत पाकिस्तानात राहिले. याचवेळी, आपले सीमा सोबत कसल्याही प्रकारचे संबंध नव्हते. मात्र, तिच्यामुळे पाकिस्तानातून यायला उशीर नक्कीच झाला, असेही अंजूने म्हटले आहे.