पाकिस्तानची सीमा हैदर आणि रबूपुराचा सचिन मीणा यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सीमाला आता तिच्या आणि मुलांच्या भविष्याची काळजी वाटते. सचिनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सीमाला चार मुलांच्या शिक्षणाची आणि घरच्या कमाईची चिंता आहे. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून द्यावा, अशी विनंती तिने सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांना केली आहे.
सीमाची मुलं पाकिस्तानात शिकत होती. भारतात आल्यानंतर त्यांचा अभ्यासाशी संपर्क तुटला आहे. मुलांच्या शिक्षणात भाषा अडथळा ठरत आहे. पाकिस्तानमध्ये मुले उर्दू आणि सिंधी शिकत असत, परंतु येथे त्यांना इंग्रजी आणि हिंदीचा अभ्यास करावा लागेल. आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा विचार सचिन आणि त्याचे कुटुंब करत आहेत.
सचिनसमोर नोकरीचं संकट
ही घटना उघडकीस आल्यानंतर सचिनची नोकरी गेली. सचिन जिथे काम करायचा त्या व्यावसायिकाने सचिनला कामावर ठेवण्यास नकार दिला आहे. दुसऱ्या नोकरीसाठी सचिन अनेकांशी संपर्क साधत आहे, मात्र सर्वत्र त्याच्या पदरी निराशाच येत आहे. दुसरीकडे भारतीय शेतकरी संघटनेचे (लोकशक्ती) राष्ट्रीय अध्यक्ष मास्टर श्योराज सिंह यांनी सीमा आणि मुलांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
सीमा हैदर प्रेयसी आहे की गुप्तहेर?
सीमा हैदर प्रेयसी आहे की गुप्तहेर आहे, असा संशय अजूनही कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयबीच्या तपासात सीमेजवळून 8 मे रोजी खरेदी केलेल्या मोबाइलच्या डेटा रिकव्हरीदरम्यान, ती गुप्तहेर असल्याचं सिद्ध होऊ शकेल अशी आयएसआयसह कोणतीही लिंक सापडली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.