नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार रेल्वे दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. बिहारहून नवी दिल्ली येथे जाणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास घसरले. या दुर्घटनेत 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले. ''सीमांचल एक्स्प्रेसचे डबे घसरल्यामुळे भीषण अपघात झाला. दुर्घटनेतील प्रवाशांच्या मृत्यूमुळे दुःखी झालो आहे. जखमी प्रवाशांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, अशी मी प्रार्थना करतो'', असे ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी आपला शोक व्यक्त केला.
किती वाजता घडला अपघात?अपघातग्रस्त एक्स्प्रेस जोगबनी येथून दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलच्या दिशेनं प्रवास करत होती. यादरम्यान रविवारी पहाटे 3.58 वाजण्याच्या सुमारास सहदोई बुजुर्ग स्टेशनदरम्यान एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. कटिहारजवळ कपलिंगमध्ये काही तरी बिघाड झाला. मात्र हा बिघाड दुरुस्त न करताच एक्स्प्रेस पुढील दिशेनं रवाना झाला, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.
आर्थिक मदत जाहीरअपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये, गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोयळ जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवाय, जखमींचा सर्व खर्च रेल्वे विभागातर्फे करण्यात येणार आहे.
दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशरेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अपघाताबाबत शोक व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. गोयल रेल्वे अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून डबे रुळावरुन कसे घसरले?, अपघातामागील नेमके कारण काय? याचा शोध घेत आहेत.