नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसमधील १८० कोटी रुपये किंमतीच्या सदनिकांची जप्ती मनी लाँडरिंंग प्रकरणे हाताळणाऱ्या सफेमा लवादाने रद्द केली. रविवारी होऊ घातलेल्या रालोआ सरकारच्या शपथविधीपूर्वी पटेल यांना दिलासा मिळाला.
अजित पवार गटाकडून त्यांचे नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. कुख्यात इकबाल मिर्चीची पत्नी हाजरा मेमनकडून २००७ साली अवैधपणे संपत्ती खरेदी केल्याच्या आरोपावरुन ईडीने २०२२ साली पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा तसेच त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्सशी संबंधित सात सदनिका जप्त केल्या होत्या. या प्रकरणी पटेल यांची २०१९ साली ईडीने चौकशी केली होती. या जप्तीविरोधात पटेल यांनी पीएमएलएची प्रकरणे हाताळणाऱ्या सफेमा लवादात अपील केले होते.