नाशिक : जिल्हा रुग्णालयांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी कायाकल्प योजनेत राज्यातील पहिल्या पाच रुग्णालयांमध्ये नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची निवड झाली आहे़ नाशिक, वर्धा, नंदुरबार, पुणे व बुलढाणा या रुग्णालयांना प्रत्येकी एक बक्षीस निश्चित मिळणार असून एका विशेष समितीतर्फे प्रथम तीन क्रमांकासाठी या रुग्णालयांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे़ राज्य शासनाच्या विविध समितीच्या केलेल्या तपासणीत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयास चांगले गुण मिळाल्यास राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळण्याची शक्यता आहे. राज्यस्तरीय तीन सदस्यीय समितीमार्फत शनिवारी (दि़ १) ऑक्टोबरला जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली होती. या समितीने जिल्हा रुग्णालयातील कामांचे कौतुक केले होते. जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना देण्यात येणार्या सोयी-सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, कामकाजाचे स्वरूप या त्रिसदस्यीय समितीने जाणून घेतले होते़ तसेच रुग्णालयातील दस्तऐवज, नोंदी, औषधे याची माहिती या समितीने घेतली होती. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एम. होले यांच्यासह रुग्णालयातील कर्मचार्यांनी केलेल्या कामामुळेच पहिल्या पाचमध्ये रुग्णालयाची निवड झाली आहे़पहिल्या पाच क्रमांकात निवड झालेल्या रुग्णालयांची पुन्हा एकदा समितीकडून तपासणी केली जाणार आहे़ यानंतर रुग्णालयांची राष्ट्रीय पारितोषिकांसाठी निवड होणार असून केंद्रीय समितीमार्फत ही तपासणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
कायाकल्प योजनेंतर्गत पहिल्या पाचमध्ये जिल्हा रुग्णालयाची निवड
By admin | Published: October 05, 2016 11:59 PM