ऑनलाइन लोकमत
हॉस्टन, दि. 8- नासाने आपल्या अंतराळ मोहीमेसाठी 12 नवीन अंतराळवीरांची निवड केली आहे. या नव्या अंतराळवीरांमध्ये अमेरिकेतील भारतीय वंशाच्या तरूणाचा सहभाग आहे. राजा चारी असं त्या अंतराळवीराचं नाव असून तब्बल 18,300 अर्जदारांमधून त्यांची निवड झाली आहे. पृथ्वी परिभ्रमणाच्या मार्गातील सगळ्यात गडद अंतराळाच्या अभ्यासासाठी या 12 अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. नासाकडून निवडण्यात आलेल्या 12 अंतराळवीरांना नासाकडून आवश्यक ट्रेनिंग दिलं जाणार आहे.
Meet Raja Chari, one of our 12 #NewAstronauts! He's a @usairforce Lt. Col. from Cedar Falls, IA. Learn more: https://t.co/m3uvJZD3iSpic.twitter.com/IjWf4lO1CX— NASA Astronauts (@NASA_Astronauts) June 7, 2017
नासाकडून निवडण्यात आलेल्या नव्या टीममध्ये 7 पुरूष आणि 5 महिलांचा समावेश आहे. गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठी टीम अंतराळ मोहीमेसाठी निवडली गेली आहे. या 12 जणांमध्ये 6 लष्करी अधिकारी, 3 शास्त्रज्ञ, 2 वैद्यकीय डॉक्टर आणि एक स्पेसएक्स इंजीनियर आहे. याव्यतिरिक्त या टीममध्ये नासाचा एक रिसर्च पायलटसुद्धा असेल.
नासाकडून निवड झालेले लेफ्टनंट कर्नल राजा चारी 39 वर्षांचे आहेत. 461 व्या फ्लाइट टेस्ट स्कॉड्रनचे कमांडर आणि कॅलिफोर्नियाच्या एडवर्ड एअरफोर्स बेसवरील एम 35 इंटीग्रेटेड टेस्ट फोर्सचे डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. वॉटरलूमध्ये राहणाऱ्या चारी यांनी एमआईटीमधून एरोनॉटिक्सची मास्टर डिग्री घेतली आहे. तसंच यूएस नेवल टेस्ट पायलट स्कूलमधून त्यांनी ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं आहे. चारी यांचे वडील भारतीय आहेत.
नासाने दिलेल्या माहितीनूसार, दोन वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नव्या अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मिशन संबधीत संशोधनाचं काम दिलं जाणार आहे.