नवी दिल्ली : भारतीय लष्कराने ऐतिहासिक निर्णय घेत लष्कराच्या उड्डयन विभागाच्या लढावू हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली आहे. लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी वैमानिक म्हणून महिलांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर सहा महिन्यांनी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन महिला अधिकारी महाराष्ट्रातील नाशिक येथील लढावू लष्कर उड्डयन प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण घेतील. १५ महिला अधिकाऱ्यांनी लष्कराच्या उड्डयन दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि, दोनच महिला अधिकारी कठोर निवड प्रक्रियेतून पात्र झाल्या. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढल्या वर्षी या दोन महिला अधिकारी लष्कराच्या उड्डयण दलाच्या सेवेत रुजू होतील.२०१८ मध्ये फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी लढावू विमानाच्या पहिल्या भारतीय सारथी होऊन भारतीय वायुदलाच्या इतिहासात नवा अध्याय जोडला होता. मागच्या वर्षी भारतीय नौदलानेही महिला वैमानिकांची पहिली तुकडी डॉर्नियर सागरी विमान विभागात तैनात करण्याची घोषणा केली होती.
दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांची वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 6:49 AM