मुंबई : निवडणुकीत हमखास यश मिळवायचे असेल तर महिलांचे मतपरिवर्तन केल्याशिवाय ते अशक्य आहे. एक महिला संपूर्ण घराचे मतदान फिरवू शकते ही जाणीव असल्यानेच की काय, ‘ताई, माई आक्का...’ अशी घोषणा देत महिलांना आवाहन केले जाते. यंदाही बचत गटांच्या मेळाव्यांमध्ये तेच ध्येय ठेवले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक महिलांची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी नेते कामाला लागले आहेत. तर बचत गटही या संधीचा फायदा घ्यायचाच असे ठरवून सक्रिय झाले आहेत.महिलांना रोजगार निर्मिती आणि तिच्या स्वावलंबासाठी उभारलेल्या चळवळीत राजकारणाचा शिरकाव झाल्याने सध्या ही मोठी चळवळ आकार घेत आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होताच बचत गटांचे मेळावे, बैठका सुरु झाल्या आहेत. घराघरात पोहोचण्याचा मार्ग म्हणून बचत गटांना प्राधान्य दिले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून भगिनी, सभा, भागिरथी असो किंवा गृहिणी महोत्सवाच्या निमित्ताने महिलांना बचतगटांतर्फे एकत्र बांधून ठेवलेले आहे. या बचतगटांच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळात प्रचार केला जातो. या महिलांना पक्षाचे झेंडे तयार करण्याचे काम दिले जाते. शिवाय जेवण, प्रचार फेऱ्या हळदी-कुंकू कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेतले जातात. तर काही ठिकाणी महिला बचत गटाच्या महिलाच पुढाऱ्यांकडे विविध वस्तूंची मागणी करतानाही दिसून येत आहेत.(प्रतिनिधी)
बचतगटही राजकीय पक्षांचे लक्ष्य
By admin | Published: September 26, 2014 2:12 AM