ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - भारत सरकारने आम्हाला परवानगी दिली तर, आम्ही फक्त "मेक इन इंडिया"अंतर्गत बनणा-या उत्पादनांची भारतात विक्री करु असे वॉलमार्टने म्हटले आहे. केंद्र सरकारने परवानगी दिली तर, प्रत्यक्ष दुकांनामधून आणि ऑनलाइन उत्पादने विकण्याची वॉलमार्टची योजना असल्याचे वृत्त इकोनॉमिक्स टाइम्सने दिले आहे. वॉलमार्ट ही रिटेल क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.
मेक इन इंडिया अंतर्गत बनणारी उत्पादने विकण्यास आमची काही हरकत नाही. कारण आमच्या कॅश अँड कॅरी स्टोर्समध्ये एकूण मालाच्या फक्त 5 टक्के परदेशी उत्पादने असतात असे वॉलमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिष अय्यर म्हणाले. वस्तू आयात करणे सुपरमार्केटच्या फायद्याचे नसते. आयात केलेल्या वस्तूंवर भराव्या लागणा-या सीमा शुल्कामुळे वस्तूची किंमत वाढते असे अय्यर यांनी सांगितले. वॉलमार्ट भारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेत भागीदार आहे.
केंद्र सरकार किराणा माल विक्रीचे क्षेत्र परदेशी कंपन्यांसाठी खुले करण्याचा विचार करत आहे. पण यामध्ये स्थानिक शेतक-यांकडून माल विकत घेण्याचे बंधन असू शकते. वॉलमार्टची सध्या भारतात आठ राज्यात एकूण 20 दुकाने आहेत. वॉलमार्टने भारती एंटरप्राईजेससोबत मिळून भारतात व्यवसाय सुरु केला होता. ऑक्टोंबर 2013 मध्ये ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर वॉलमार्टने भारतीकडून 50 टक्के शेअर्स विकत घेतले. भारतात परदेशी सुपरमार्केटसना भाजपा सरकारचा विरोध आहे पण रोजगार निर्मिती, शेतक-यांच्या मालाला भाव आणि अन्नाची नासाडी कमी करणे यासाठी भाजपा सरकारच्या रीटेल क्षेत्रासंबंधीच्या धोरणात बदल झाला आहे.