जयपूर :
माणसाच्या डोक्यावरच्या केसांना इतकी मोठी मागणी आहे की त्यांची किंमत प्रतिकिलोमागे एक लाख रुपयेदेखील असू शकते. म्हणजे या रकमेतून आयफोन-१४ किंवा दीड तोळे सोने खरेदी करता येऊ शकेल. विविध पार्लर तसेच व्यक्तींकडून केस गोळा करून त्यांच्यावर कोलकातासह काही ठिकाणी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे केस विग बनविण्यासाठी चीन व इतर देशांत पाठविले जातात. केसांची किंमत दर्जावरून ठरते. उत्तर भारतीयांच्या डोक्यावरील केसांना मोठी मागणी आहे. तेथील शहरात फेरीवाले घरोघरी जाऊन केस खरेदी करतात.
नेमका वापर कशासाठी?हे केस गोळा करून कोलकाता, चेन्नई येथील फॅक्टरींमध्ये केमिकल ट्रीटमेंटसाठी पाठविले जातात. तिथे या केसांचे काळ्या रंगाने पॉलिशिंग केले जाते. विविध कंडिशनर लावून केस आणखी मुलायम केले जाते. त्यानंतर हे केस चीन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ब्रिटन येथे विग बनविण्यासाठी पाठविले जातात.
काेणत्या केसांना मागणी?- रेमी हेअर प्रकारामध्ये हे केस समान लांबीचे व एकाच दिशेने वाढलेले असतात. या केसांपासून बनलेला विग हा अधिक किमतीचा व उत्तम दर्जाचा असतो व तो एक वर्षाहून अधिक काळ टिकतो. - व्हर्जिन हेअर या प्रकारातील केसांना कधीही रंग लावला जात नाही किंवा त्यांना डाय करण्यात येत नाही. - विदेशामध्ये निर्यात होणारे बहुतांश केस व्हर्जिन हेअर प्रकारातील असतात. अशा केसांची मागणी चीन, ब्रिटन, युरोपमध्ये सर्वाधिक आहे.