नवी दिल्ली : भविष्यात भारत आणि अमेरिका हे दोन देश मंगळ ग्रहाशी संबंधित संशोधनासाठी संयुक्तपणे मोहीम राबविण्याची आणि या मोहिमेवर एका भारतीय अंतराळवीराला लाल ग्रहावर पाठविले जाण्याची शक्यता आहे. या मंगळ मोहिमेत सहभागी होण्याचे व त्यासाठी अंतराळवीर पाठविण्याचे आवाहन अमेरिकेच्या ‘नासा’ने भारताला केले आहे.मंगळावर पाठविण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या ‘मंगळ याना’द्वारे अतिशय कमी खर्चात उच्चस्तरीय मंगळ मोहीम यशस्वी करण्याची इस्रोची क्षमता जगाला दिसली होती. भारत आणि अमेरिका एकत्र येऊन मंगळावर संशोधन करू शकतात, असे क्युरोसिटीसारख्या रोव्हरच्या माध्यमातून अमेरिकेच्या बहुतांश संशोधनांचे नेतृत्व करणाऱ्या नासाच्या जेट प्रपोल्शन लेबॉरेटरीचे संचालक चार्ल्स इलाची यांनी म्हटले आहे आणि त्यांनी लाल ग्रहावर अंतराळवीर पाठविण्यासाठी भारताला आमंत्रणही दिले आहे. आम्ही एक संयुक्त अन्वेषण मोहिमेवर विचार करीत आहोत. मार्स आॅर्बिटर मिशन यशस्वी ठरल्यानंतर भारत आमचा मोठा सहकारी बनला आहे. मंगळाच्या संशोधनासाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये भारत एक मोठा भागीदार बनू शकतो, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.मंगळावर अंतराळवीर पाठविण्याच्या कार्यक्रमात भारताचे सहकार्य घेण्याचा विचार आहे किंवा काय, या प्रश्नाच्या उत्तरात इलाची म्हणाले, नासाने मंगळावर मानव पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. नासा त्याकडे एक आंतरराष्ट्रीय प्रयत्न म्हणून बघत आहे. मानवाला मंगळ आणि आसपास पाठविण्याच्या मार्गावर एकत्रितपणे विचार करण्यासाठी नासाने आंतरराष्ट्रीय संस्थांना आमंत्रित केलेले आहे. (वृत्तसंस्था)
मंगळ मोहिमेसाठी अंतराळवीर पाठवा
By admin | Published: February 29, 2016 3:13 AM