पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. या संसद भवनामध्ये ऐतिहासिक सेंगोल हा लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोर स्थापित करण्यात येणार आहे. हा सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांनी भारताकडे केलेल्या सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक आहे. दरम्यान, एवढी वर्षे फारसा चर्चेत नसलेला हा सेंगोल कसा काय समोर आला, याची कहाणीही फार रंजक अशी आहे.
केंद्रातील मोदी सरकारने १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री इंग्रजांकडून भारताला सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून दिलेल्या सेंगोलचं महत्त्व आणि सेंगोल वेस्टिंग सेरेमनीची प्रामाणिकता स्थापिर करण्यासाठी १९४७ च्या आधीचा अधिकृत रेकॉर्ड आणि माध्यमांमध्ये प्रकाशित झालेले लेख शोधून काढण्यासाठी जवळपास दोन वर्षे शोध घेतला. त्यामध्ये टाइममध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखाचाही समावेश आहे. तुगलक नावाच्या नियतकालिकामध्ये ५ मे २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या एस. गुरुमूर्ती यांच्या लेखाने या कामाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारला प्रोत्साहित केले. एका तमिळ संतांनी भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दिलेला सेंगोल हा स्वातंत्र्याचं प्रतीक होता, असं म्हटलेलं होतं.
काही दिवसांतच प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांनी एस. गुरुमूर्ती यांच्या लेखाचा इंग्रजी अनुवाद पंतप्रधानांच्या कार्यालयाला पाठवला. त्यांनी पीएमओला पाठवलेल्या आपल्या निवेदनात सांगितले की, सेंगोल वेस्टिंगच्या एका पारंपरिक, पवित्र आणि ऐतिहासिक समारंभाला सार्वजनिक ज्ञान आणि इतिहासापासून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तसेच मोदी सरकारने २०२१ च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या प्रसंगी ते सार्वजनित केले पाहिजे. त्यामुळे पीएमओ आणि सांस्कृतिक मंत्रालयाला सेंगोलचं महत्त्व स्थापित करण्यासाठी जुने रेकॉर्ड आणि मीडिया रिपोर्ट शोधण्याची प्रेरणा मिळाली.
अधिकाऱ्यांनी प्रतिष्ठित लेखकांची पुस्तके, वर्तमान पत्रांमधील प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख या संदर्भातील विवरण एकत्र केलं आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या निवासस्थानी सेंगोल सुपुर्द करण्याबाबतची ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीकडे लक्ष वेधले. पंडित नेहरूंच्या खासगी पत्रांमध्ये याचा संदर्भ आणि काही छायाचित्रे उपलब्ध आहेत का याचा तपास करण्याची विनंती नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्रेरीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे करण्यात आली. यादरम्यान, २५ ऑगस्ट १९४७ रोजी टाइम नियतकालिकाध्ये प्रकाशित झालेला एक लेख मिळाला. सेंगोलबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आलं होतं.
त्याचप्रमाणे १९४७ च्या इतर काही मीडिया रिपोर्ट्समधूनही त्याला दुजोरा मिळाला. डीएमके सरकारकडून प्रकाशित एका नोटमध्येही १९४७ च्या सेंगोल समारंभाबाबतचा उल्लेख सापडला. डीएमके सरकारने २०२१-२२ मध्ये तामिळनाडू विधानसभेला सादर केलेल्या एका रिपोर्टमध्ये याची माहिती सापडली. त्यानंतर हा ७७ वर्षे जुना सेंगोल केंद्र सरकारला अलाहाबादमधील एका संग्रहालयामध्ये सापडला. तो अनेक दशके एका अज्ञात स्थळी सुरक्षित ठेवण्यात आला होता. तसेच त्याचा नेहरूंचा सोन्याची छडी म्हणून उल्लेख केला जात असे. आता हा सेंगोल नव्या संसदेमधील लोकसभेत अध्यक्षांच्या आसनासमोर स्थापित केला जाईल.