नवी दिल्ली - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार के.जे. अल्फोन्स यांनी राज्यसभेमध्ये एक मोठं विधान केलं. ते म्हणाले की, रिलायन्स असो, अंबानी असो वा अदानी किंवा अजून कोणी, त्यांची पूजा केली गेली पाहिजे. त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. कारण ते देशातील लोकांना रोजगार देतात.
राज्यसभेमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार के.जे. अल्फोन्स म्हणाले की, तुम्ही माझ्यावर भांडवलशाहांचा प्रवक्ता असल्याचा आरोप करू शकता. मात्र जी कुणी व्यक्ती देशामध्ये रोजगाराची निर्मिती करते, मग ती रिलायन्स असो, अंबानी असो वा अदानी असो किंवा कुणी अन्य असो, त्यांची पूजा केली गेली पाहिजे. कारण ते रोजगार देतात. दरम्यान, के.जे. थॉमस यांच्या या वक्तव्यावर राजद खासदार मनोज झा यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली आहे.
दरम्यान, अल्फोन्स म्हणाले की, अंबानी, अदानी यांच्यासह पैशांची गुंतवणूक करणारा प्रत्येक व्यावसायिक हा रोजगार निर्मिती करत असतो. मी कधीही अंबानींसोबत चहापान केलेलं नाही. मात्र मी या गोष्टीचं पूर्णपणे समर्थन करतो. देशातील प्रत्येक ईमानदार व्यक्ती जे रोजगार निर्मिनी करतात त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अल्फोन्स म्हणाले की, एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये १०१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? गुगलचे लेरी पेज यांच्या संपत्तीमध्ये १२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बेजोस यांच्या संपत्तीमध्ये ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्व टॉप १० उद्योजकांमध्ये बिल गेट्स सर्वात शेवटी आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक असमानता हे एक सत्य आहे. ते तुम्ही स्वीकारलं काय किंवा नाकारलं काय त्यात फरक पडत नाही.