पाटणा: भाजपा नेतृत्त्वावर नाराज असलेल्या यशवंत सिन्हा यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सिन्हा यांनी नोटाबंदी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मी आता पक्षीय राजकारणातून संन्यास घेत आहे. माझे भाजपासोबतचे संबंध संपुष्टात आले आहेत, असे यशवंत सिन्हा यांनी पाटण्यात बोलताना जाहीर केलं.
देशातील सध्याची स्थिती चिंताजनक असल्याचं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं म्हणत सिन्हा यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधलं. पक्षीय राजकारणातून निवृत्त झालेले यशवंत सिन्हा राष्ट्रमंच स्थापन करणार आहेत. संसदेचं नुकतंच झालेलं अधिवेशन पूर्णपणे वाया गेलं. त्यावरुनही सिन्हा यांनी भाजपावर तोफ डागली. 'वाजपेयींच्या सरकारमध्ये मी अर्थमंत्री होतो. मात्र त्यावेळी आम्ही विरोधकांना बोलण्याची संधी देत होतो. त्यांच्याशी संवाद साधत होतो. मात्र आता संसदेचं कामकाज चालत नसतानाही पंतप्रधान मोदी गप्पच होते. त्यांनी एकदातरी विरोधकांशी संवाद साधला का?,' असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला.
मोदी सरकारला संसदेचं अधिवेशन चालू द्यायचं नव्हतं, असा स्पष्ट आरोप यशवंत सिन्हा यांनी केला. 'संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची असते. मात्र मोदी सरकारला याबद्दल कोणतीही चिंता नव्हती. उलट संसदेचं कामकाज चालत नसल्यानं सरकारला आनंदच झाला. कारण विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाणार होता. हा प्रस्ताव आणण्यासाठी 50 खासदारांचं समर्थन आवश्यक असतं. मात्र प्रस्तावाला किती जणांचं समर्थन आहे, हे मी मोजू शकत नाही, असं म्हणून लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना प्रस्ताव आणू दिला नाही. मोदी सरकारनं अशाप्रकारे लोकशाहीची थट्टा चालवली आहे,' अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.