मंत्र्याची जीभ घसरली; म्हणाले- वृद्ध दगावले तरी हरकत नाही, मुलांना मिळायला हवी होती लस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 02:41 PM2021-06-12T14:41:36+5:302021-06-12T14:47:41+5:30
"आपल्याला माहीत आहे का, लस कुणाला दिली जाते. आपल्या देशात आजवर कोणतीही लस केळव मुलांनाच देण्यात आली आहे. वृद्धांना लस कुठे लागते?"
जयपूर - कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक नेत्यांनीही कोरोना व्हायरस आणि कोरोना लशीसंदर्भात आपापले ज्ञान पाझळायचा प्रयत्न केला आहे. यातच आज, कोरोना महामारी आणि लसीकरणासंदर्भात बिनबुडाचे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या यादीत राजस्थानचे जल आणि उर्जामंत्री बीडी कल्ला यांचेही नाव आले आहे. त्यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात भाष्य केले आहे.
बीडी कल्ला म्हणाले, आपल्याला माहीत आहे का, लस कुणाला दिली जाते. आपल्या देशात आजवर कोणतीही लस केळव मुलांनाच देण्यात आली आहे. वृद्धांना लस कुठे लागते?कोरोनातही सर्व प्रथम मुलांनाच लस टोचली जायला हवी. कारण मुले सुरक्षित असणे आवश्यक आहे. मोदी सरकारने कोरोना लस वृद्धांना द्यायला सुरू केले.
कल्ला पुढे म्हणाले, मी स्वतः वृद्ध लोकांना बोलताना ऐकले आहे, की आम्ही तर असेही 80-85 वर्षांचे झालोच आहोत. आमचा कोरोनाने मृत्यूही झाला तरी काही हरकत नाही. मात्र, मुले सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यामुळे सर्वप्रथम मुलांना लस देण्यात यावी. मंत्री मोहोदय एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी केंद्र सरकारवरही हल्ला चढवला.
कल्ला म्हणाले, पंतप्रधान मोदींचे लसीकरण धोरण चुकीचे आहे. लस आली तर ती सर्वप्रथम मुलांना टोचायला हवी. मात्र, मोदी सरकारने असे केले नाही. यामुळेच समस्या एवढी वाढली आहे.
केंद्रीय मंत्र्यांचा पलटवार -
केंद्रीय जल संसाधन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानचे मंत्री बीडी कल्ला यांच्या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे. ते म्हणाले, लशीसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांचे हास्यास्पद ज्ञान आणि वक्तव्य ऐका. एवढेच नाही, तर आता काँग्रेस व्हॅक्सीन राजकारणावरून क्लाउन राजकारणावर आली आहे, असेही शेखावत म्हणाले.