ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर, आता विमानाने करता येणार मोफत प्रवास; 'या' राज्यातील मुख्यमंत्र्यांची घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 04:22 PM2023-02-07T16:22:05+5:302023-02-07T16:22:46+5:30
रेल्वेने दिलेल्या सवलतीनंतर आता मध्य प्रदेशात विमानात मोफत प्रवासाची सुविधा मिळत आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens News) विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. सरकारकडून रेल्वे आणि बँकांपर्यंत अनेक कामांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सूट मिळते. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुविधेबद्दल सांगत आहोत, ज्या अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिक मोफत विमानाने प्रवास करू शकणार आहेत. रेल्वेने दिलेल्या सवलतीनंतर आता मध्य प्रदेशात विमानात मोफत प्रवासाची सुविधा मिळत आहे.
राज्य सरकारने ही सुविधा सुरू केली
केंद्रासोबतच राज्य सरकारकडूनही अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली असून त्यामध्ये त्यांना विमानाने प्रवास करण्याची सुविधा दिली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून विमानाने तीर्थयात्रेला जाण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. भिंड येथील संत रविदास यांच्या जयंती आणि चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
सरकारी खर्चाने करता येईल प्रवास
या तीर्थ दर्शन योजनेत अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यात संत रविदासांच्या जन्मस्थानाचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक सरकारी खर्चाने तीर्थक्षेत्री जाऊ शकतात.
राज्य सरकार करते आहे अपग्रेड
याचबरोबर, मुख्यमंत्री म्हणाले की, भिंडमध्ये सध्या नगरपरिषद आहे. राज्य सरकार नगरपालिका म्हणून अपग्रेड करण्याचे काम करत आहे. यासोबतच शहराला वैद्यकीय महाविद्यालयही मिळणार आहे. तसेच, 'विकास यात्रा' राज्यातील सर्व वाड्या आणि गावांना भेट देऊन पात्र लोकांना शासकीय योजनांचा लाभ देईल. याशिवाय, विकासात्मक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.