नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बुटा सिंग यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांचे वय ८६ होते. मेंदूत रक्तस्राव झाल्याने गेल्या ऑक्टोबरपासून ते बेशुद्धावस्थेत होते व त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
त्यांच्यावर लोदी रोड स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. बुटा सिंग हे आठ वेळा खासदार बनले होते व ते बिहारचे माजी राज्यपाल होते. त्यांनी चार पंतप्रधानांसमवेत काम केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, बुटा सिंग हे उत्तम प्रशासकीय कौशल्य तसेच तळागाळातील माणसांविषयी कणव असलेले नेते होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदींनी बुटा सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, बुटा सिंग हे देशाकरिता व जनकल्याणासाठी आयुष्यभर काम करत राहिले. बुटा सिंग यांचा जन्म पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात २१ मार्च १९३४ रोजी झाला.