काँग्रेसचे पंजाबमधील ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांचे होणार निलंबन, शिस्तपालन समितीने केली शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 04:01 PM2022-04-26T16:01:42+5:302022-04-26T16:02:10+5:30
Congress News: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षामधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात येऊ शकते.
चंडीगड - पंजाबकाँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षामधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात येऊ शकते. एके अँटोनी यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने जाखड यांना दोन वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याची शिफारस केली आहे. तसेच केरळमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते के.व्ही थॉमस यांनाही पक्षातील सर्व पदांवरून हटवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशींवर अंतिम निर्णय हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहेत.
सुनील जाखड यांच्याविरोधात कारवाईची शिफारस ही पंजाबचे प्रभार हरिश तिवारी यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून जाखड यांच्या काही विधानांकडे लक्ष वेधल्यानंतर करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी हे पत्र शिस्तपालन समितीकडे पाठवले होते. त्यानंतर शिस्तपालन समितीने कारवाईचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने ११ एप्लिल रोजी सुनील जाखड यांना कथित पक्षविरोधी हालचालींबाबत कारणे दाखवा नोटिस बजावली होती. त्यानंतर एका आठवड्याच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र जाखड यांनी समितीला उत्तर न देण्याचा निर्णय घेतला होता.
सुनील जाखड यांनी माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर टीका केली होती. तसेच पंजाबमध्ये आपकडून झाल्यानंतर चन्नी हे पक्षासाठी ओझे असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी जाखड यांच्यावर त्यांनी चन्नी आणि अनुसूचित जातींबाबत आक्षेपार्ह आणि जातीवाचक भाषा वापरल्याचा आरोप केला होता. मात्र जाखड यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.