नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन झालं आहे. चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालं. गुरुदास कामत काल दिल्लीत अहमद पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेले होते. पटेल यांना भेटून सायंकाळी ते हॉटेलमध्ये मुक्कामाला गेले. मध्यरात्री त्यांना हार्ट अटॅक आला. तेथून त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं करण्यासाठी गुरुदास कामत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. गेल्याच वर्षी त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. गुरुदास कामत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फारच जवळच होते.काँग्रेसनं त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दिव दमन या राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या वर्षी त्यांचं मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या संजय निरुपम यांच्याबरोबर वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. गुरुदास कामत ब-याचदा काँग्रेसकडून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांत त्यांचं प्राबल्य होतं. 1972मध्ये त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1976ला त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपदही भूषवलं. 1984ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. 2009 ते 2011मध्ये यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांकडून त्यांचा पराभव झाला होता.
Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 9:04 AM