नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे सोमवारी निधन झाले. त्यांचे वय ९३ वर्षांचे होते. फुप्फुस व मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या त्रासामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एस्कॉर्ट्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मोतीलाल व्होरा यांच्या पार्थिवावर छत्तीसगढमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
मोतीलाल व्होरा यांना ऑक्टोबरमध्ये कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून ते बरे झाले होते. १९ डिसेंबरला त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा रविवारी ९३वा वाढदिवस होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले. मोतीलाल व्होरा यांचा जन्म २० डिसेंबर १९२७ रोजी झाला. मोतीलाल व्होरा यांनी काही हिंदी व इंग्रजी दैनिकांमध्ये पत्रकारिताही केली होती.
काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून त्यांनी सुमारे दोन दशके काम पाहिले. उत्तर प्रदेशचे राज्यपालपदही त्यांनी भूषविले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षातील प्रशासकीय बाबींचे सरचिटणीस म्हणून मोतीलाल व्होरा यांची निवड करण्यात आली. ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते.
अफाट संघटन कौशल्य असलेले नेता : मोदीज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे अफाट प्रशासकीय व संघटन कौशल्य होते. त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द सर्वांच्याच लक्षात राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे सच्चे अनुयायी व दिलदार व्यक्ती होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रियांका गांधी यांनीही मोतीलाल व्होरा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.