नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. ही चारही राज्यं राखण्यात भाजपला यश आलं आहे. तर काँग्रेसच्या ताब्यात असलेलं पंजाब आम आदमी पक्षाच्या हाती गेलं आहे. केंद्रामधील सत्ता गेल्यापासून झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सातत्यानं अपयशी ठरत आहे. नेतृत्त्व बदलाची मागणी करत जी-२३ नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर काँग्रसचे नेते माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली यांनी भाष्य केलं आहे.
भाजप आणि इतर पक्ष येत जात राहतील. पण केवळ काँग्रेस हा एकमेव असा पक्षा आहे जो कायम राहील, असं मोईली म्हणाले. पक्षाच्या नेत्यांनी आपला दृष्टीकोन बदलायला हवा, असा सल्लादेखील त्यांनी दिला. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आयुष्य, समाज आणि प्रत्येक गोष्टीबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस पक्ष कायम राहणार आहे. आपण अपेक्षा ठेवायला हव्यात. आपण विश्वास गमावता कामा नये, असं मोईलींनी म्हटलं.
काँग्रेसमध्ये नाराज नेत्यांचा एक गट आहे. २३ नेत्यांचा हा गट जी-२३ नावानं ओळखला जातो. या नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्य्या घरी आज बैठक झाली. त्यानंतर मोईली यांचं विधान आलं आहे. जी-२३ गट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे पक्ष कमजोर होत आहे. भाजप कायम राहणारा पक्ष नाही. मोदी युग संपल्यानंतर त्यांचा निभाव लागणं अवघड असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.