नुकतेच देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला तर दुसरीकडे भाजपला चांगलं यश मिळालं. या निवडणुकांच्या निकालांनंतर काँग्रेसमधील वाद समोर आला होता, परंतु अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. "२०१४ नंतर कमकुवत होण्याचं कारण असं की मोदींसारखा आक्रमक प्रचार करणारा नेता देशाला मिळाला. त्यांच्या प्रचाराच्या भाषेमुळे, वक्तृत्वामुळे लोक वाहवत गेले. अनेक मोठ्या नेत्यांचादेखील पराभव झाला," असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
"त्यांनी अनेक आश्वासानं दिली. खोटा प्रचार करायचा आणि लोकांना भावनेच्या भरात न्यायचं अशा प्रचारामुळे लोक वाहवत गेले. परंतु आता लोकांना कळायला लागलं आहे," असंही शिंदे म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केला. "मोदींचा अचानक उदय झाला. अनेक लोक त्यांच्या वक्तव्यात वाहवत गेले. हे अनेक ठिकाणी झालं. परंतु दक्षिण भारतात तसं झालं नाही. आम्ही तरुणांना सर्व नेतृत्व द्यायचं आणि बदल त्यांना करायला सांगायचे असा प्रकार करून पाहिला, त्यात थोडी गफलत झाल्यासारखं मला वाटतं. मी पक्षावर थेट टीका करू शकत नाही. ही एक प्रक्रिया आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
"काँग्रेसचा आलेख हळूहळू खाली येत गेला त्याला काही कारणं आहेत. आम्ही सर्वच १० वर्षांची सत्ता भोगल्यामुळे सक्रीय नव्हतो. संघटना बांधण्याचं काम मुख्यत्वे व्हायला हवं होतं, तेही झालं नाही. त्यामुळे आम्हाला थोडं मागे पाहावं लागतंय," असंही ते म्हणाले. "तरुणांच्या हाती सर्व दिलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. ते स्थिर नको. ते स्थिर झालं तर प्रगती होत नाही. जनतेनं यावेळी बदल हवा होता आणि त्यामुळे त्यांनी मोदींना कौल दिला, असं माझं मत आहे," अशंही शिंदे यांनी नमूद केलं.
"उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही""सोनिया गांधी या शक्तिशाली आणि समंजस नेत्या आहेत. त्यांना अनेक गोष्टींची कल्पना आहे. त्यांच्या इतकं हुशार असणारा नेता आमच्याकडे नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. मुलाखतीदरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना काय सुचवू इच्छिता असा सवाल करण्यात आला. "ज्यावेळी आमच्या बैठका होतात तेव्हा आम्ही सांगतो. परंतु तीन चार वर्षांत भेट झाली नाही. मी गेलोही नाहीये. मला त्यांच्याकडून बोलावणं येतं, परंतु आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही. आता नव्या पिढीच्या हाती सर्व सोपवलं आहे," असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
"आम्ही गांधी घराण्याला स्वीकारणारेच""आम्ही जे बोलतो ते काँग्रेसच्या अध्यक्षांसोबत बोलतो. बाकीचे जे खासदार आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांना बोलून काही फरक पडत नाही. प्रियंका आणि राहुल गांधी आमचे नेतेच आहेत आणि त्यांच्याशी संवाद असतात," असंही त्यांनी सांगितलं. "आम्ही गांधी घराण्याला स्वीकारणारे आहोत. त्यातून आलेलं नेतृत्व आम्हाला मान्यच आहे. पण ते कोणी करावं हे समितीच ठरवेल. गांधी घराण्यात सध्या सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका आहेत. या तिघांमुळे घराणं टिकून आहे. त्या घराण्यातून जो विचार येतोय तो काँग्रेसचा आहे. एखाद्या वेळी चूक झाली असेल पण सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.