नवी दिल्ली - काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पदभार स्वीकारताच परंपरेनुसार कार्यकारिणी सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर नव्या अध्यक्षांनी ४७ सदस्यीय सुकाणू समिती गठित केली होती. आता, पुन्हा एकदा मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधीसह देशातील बड्या काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. या यादीनुसार, राष्ट्रीय कार्यकारिणीत ३९ सदस्य आहेत. कायम निमंत्रित म्हणून १८ सदस्य असून ५ निरीक्षक असणार आहेत.
काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणूगोपाल यांनी यासंदर्भात पत्रक जारी केलं असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निर्देशानुसार ही समिती कार्यकारिणी सदस्य, कायम आमंत्रित सदस्य आणि निरीक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. अशोक चव्हाण यांनीही यासंदर्भात ट्विट करुन पक्ष नेतृत्त्वाचे आभार मानले आहेत.
अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. मात्र, आपण कुठेही जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच आहे, असणार असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे, या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता, काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातून एकमेव अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आलं आहे. हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून मी या सेवेसाठी आभारी असल्याचं अशोक चव्हाण यांनी निवडीनंतर ट्विटरवरुन प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
काँग्रेस पक्षाची मूल्ये आणि तत्त्वे जपण्यासाठी, पक्षाच्या वाढीसाठी आणि यशात योगदान देण्यासाठी मी संपूर्ण ताकदीने समर्पित आहे. पुढे असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या देशाच्या उज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करण्यासाठी सर्वच सहकारी आणि काँग्रेस नेतृत्वासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.