भोपाळ:भोपाळमध्ये एका सिनीअर डॉक्टरच्या मृत्यूचा व्हिडिओ समोर आला आहे. पार्टीत नाचत असताना ज्येष्ठ डॉक्टर सीएस जैन(67) यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये 50 डॉक्टर उपस्थित होते. त्यांनी जैन यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि जवळच्या मल्टी स्पेशालिटी स्मार्ट सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण त्यांना वाचवता आले नाही.
सविस्तर माहिती अशी की, भोपाळमधील हॉटेल जहानुमा येथे डॉक्टरांनी गेट-टुगेदरचे आयोजन केले होते. शहरातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमातील एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात अनेक डॉक्टर 'ऐसा मौका फिर कहां मिलेगा...'या गाण्यावर नाचत आहेत. डॉ. जैनदेखील इतर डॉक्टरांसोबत या गाण्यावर नाचत होते.
यावेळी अचानक ते काही सेकंद थांबले आणि अडखळत खाली कोसळले. ते खाली कोसळताच इतर डॉक्टर त्यांच्या जवळ आले आणि जैन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतर डॉक्टरांनी जैन यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. काही वेळानंतर जैन यांना हॉटेलच्या शेजारी असलेल्या हॉस्पिटलमध्येही भरती करण्यात आले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.