gayatri rathore ias : सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. हास्यास्पद तितक्याच संतापजनक घटना समोर येत असतात. आता IAS अधिकारी गायत्री राठोड यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राजस्थानमधील वैद्यकीय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या प्रधान सचिव आणि वरिष्ठ IAS गायत्री राठोड यांनी बेरोजगार तरुणांसाठी एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे. गायत्री राठोड यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या राज्यातील बेरोजगार तरुणांना, त्यांच्यासाठी सरकारने सर्व व्यवस्था करावी, असे संबंधित तरुणांनी सांगितले. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना गायत्री राठोड म्हणाल्या की, सरकारला विचारुन तुमचा जन्म झालाय का? असा प्रश्न करत गायत्री यांनी तरुणांना फटकारले. प्रधान सचिवांच्या या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, गायत्री राठोड यांच्या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. सरकार जनतेच्या हिताचा विचार करत नसेल तर सरकारला काय अर्थ आहे, असा सवाल सोशल मीडियावर अनेकजण विचारत आहेत. संबंधित विभागात भरती न झाल्याने नाराज बेरोजगार तरुण मुख्य सचिवांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी एका तरुणाने आपली व्यथा मांडत भरतीच्या प्रतीक्षेत आपले आयुष्य संपत असल्याचे सांगितले. अशा स्थितीत त्याने आता कुठे जायचे? हा मुद्दा कानावर पडताच गायत्री राठोड संतापल्या. "तुम्ही सरकारला विचारुन जन्माला आलात का?", अशा शब्दांत त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.
गायत्री राठोड वादाच्या भोवऱ्यात वरिष्ठ अधिकारी गायत्री राठोड गेल्या महिन्यातच वैद्यकीय आणि आरोग्य विभागात रुजू झाल्या. याआधी त्या राज्याच्या पर्यटन, कला, साहित्य, संस्कृती आणि पुरातत्व विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होत्या. याशिवाय जवाहर कला केंद्रात महासंचालकपदाची जबाबदारीदेखील त्यांनी सांभाळली आहे. याआधी त्यांनी विविध विभागांमध्ये प्रधान सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे.