नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ (Vinod Dua) यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआ हिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. विनोद दुआ यांच्या पार्थिवावर उद्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हिंदी पत्रकारितेतील बहुचर्चित नाव म्हणून विनोद दुवा यांच्याकडे पाहिले जाते. वक्तृत्व शैली, अचूक विश्लेषण आणि मुद्देसूद मांडणी यामुळे आजही त्यांचे विश्लेषणात्मक कार्यक्रम आवर्जुन पाहिले जातात. विनोद दुआ यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये दीर्घकाळ काम केले होते. 1996 मध्ये त्यांना रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, भारत सरकारने 2008 मध्ये त्यांना पत्रकारितेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. जून 2017 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मुंबई प्रेस क्लबतर्फे रेडइंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिल्ली विद्यापीठातून शिक्षणविनोद दुआ यांचे बालपण दिल्लीतील निर्वासित वसाहतींमध्ये गेले. त्यांचे आई-वडील 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर खैबर पख्तुनख्वा येथून आले होते. विनोद दुआ हे दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज महाविद्यालयातून इंग्रजी विषयात पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातूनच इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीही मिळवली.
अँकरिंगचा दीर्घ अनुभव 1975 मध्ये विनोद दुआ यांनी युवा कार्यक्रमासाठी अँकरिंग केले. त्याच वर्षी त्यांनी जवान तरंग या तरुणांसाठीच्या कार्यक्रमाचे अँकरिंग सुरू केले. विनोद दुआ यांनी प्रणय रॉय यांच्यासोबत 1984 मध्ये दूरदर्शनवर निवडणूक विश्लेषणचे अँकरिंग केले. तसेच, त्यांनी जनवाणीचे (पीपल्स व्हॉईस) सुद्धा अँकरिंग केले होते, हा कार्यक्रम 1985 मध्ये सामान्य लोकांना थेट मंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी होती. हा शो अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम होता.
याचबरोबर, विनोद दुआ यांनी 1992 मध्ये झी टीव्ही वाहिनीच्या चक्रव्यूह शोचे अँकरिंग केले होते. तसेच, विनोद दुआ हे दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'तसवीर-ए-हिंद' शोचे अँकर होते. मार्च 1998 मध्ये त्यांनी सोनी एंटरटेनमेंट चॅनलचा शो 'चुनाव चुनौती'चे अँकरिंग केले होते. ते 2000 ते 2003 यादरम्यान सहारा टीव्हीमध्ये अँकरिंग होते. विनोद दुआ यांनी एनडीटीव्ही इंडियाच्या जाइका इंडिया या कार्यक्रमाचे अँकरिंगही केले. नंतर त्यांनी द वायर हिंदीसाठी जन गण मन की बातचे सुद्धा अँकरिंग केले होते.