नवी दिल्ली, दि. 10- हाजी मस्तान, हर्षद मेहता असो वा केतन पारेख वादग्रस्त न्यायालयीन प्रकरण आणि विधिज्ञ राम जेठमलानी हे गेली सात दशके असणारं समीकरण. मात्र, राम जेठमलानी यांनी आज आपल्या वकिली व्यवसायातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ही निवृत्तीची घोषणा करताना त्यांनी केंद्र सरकारवर नेहमीच्या शैलीत कडक भाषेत टीकाही केली असून पुढील काळातही आपण भ्रष्ट राजकारण्यांविरोधात लढत राहू असे स्पष्ट केले . नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा सन्मानसोहळा बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केला होता, त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
सध्या देशाची स्थिती आजिबात चांगली नाही, सध्याच्या व त्याच्या आधीच्या सरकारने या देशाला अत्यंत खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. या परिस्थितीवर मात करण्याची जबाबदारी बारच्या सर्व सदस्यांची व चांगल्या नागरिकांची आहे, त्यामुळेच सत्ताधा-यांना बाहेरचा रस्ता दाखवता येईल, अशा शब्दांत जेठमलानी यांनी आपले मत मांडले. मी आज निवृत्तीची घोषणा करत आहे, मात्र जीवंत असे पर्यंत भ्रष्ट राजकारण्यांविरोधात लढतच राहिन, असेही ते यावेळी म्हणाले.
राम जेठमलानी यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२३ रोजी तत्कालीन मुंबई प्रांत असलेल्या पाकिस्तानमधील शिकारपूरमध्ये झाला. त्यांनी एस. सी. शहानी लॉ कॉलेजमधून वयाच्या १७ व्या वर्षी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अनेक खटल्यांचे कामकाज पाहिले.
राम जेठमलानी यांनी ‘या’ व्यक्तींसाठी केलीय वकिली!- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेक-यांची बाजू न्यायालयात मांडली. - दिल्लीतील उपहार सिनेमा आग प्रकरणी मालक अन्सल बंधुंविरोधातील खटला.- जेसिका हत्या प्रकरणातील मनू शर्माची न्यायालयात बाजू मांडली. - १६ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूसाठी त्यांनी खटला लढवला.- लालकृष्ण अडवाणी यांची हवाला खटल्यात बाजू मांडली. - सोहराबुद्दीन खटल्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाजूने न्यायालयात लढले.- २ जी घोटाळ्यातील डीएमके नेत्या कनिमोळी यांच्यातर्फे त्यांनी बाजू मांडली.- शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता यांची बाजू न्यायालयात मांडली. याचबरोबर, हाजी मस्तान आणि केतन पारेख यांची सुद्धा त्यांनी वकिली केली.- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधातील अवैध उत्खनन खटल्यात त्यांची बाजू मांडली. - चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला.- केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुद्धा त्यांनी या प्रकरणात बाजू मांडली. मात्र, नंतर याप्रकरणातून त्यांनी माघार घेतली.