ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचे मंगळवारी पहाटे जसलोक रुग्णालयात निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सितारादेवी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
कोलकाता येथे जन्माला आलेल्या सितारादेवी यांचे मूळ नाव धनलक्ष्मी असे होते. तब्बल सहा दशक त्यांनी त्यांच्या नृत्याने रसिकांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडमध्ये कथ्थकला महत्वाचे स्थान मिळवून दिल्याचे श्रेय सितारादेवी यांना देण्यात येते. त्यांनी मधुबाला, रेखा, माला सिन्हा व काजोलसारख्या अनेक अभिनेत्रींना शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षणही दिले होते.
नृत्यातील योगदानासाठी सितारादेवींना अनेक पुरस्कार मिळाले होते. १९६९ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९७३ साली त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९९५ साली त्यांना कालीदास सन्मान व नृत्य निपुणे पुरस्कारही देण्यात आला.