Senior Lawyer Replied Vinesh Phogat Allegations: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे वजन जास्त असल्यामुळे महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपील करण्यात आले होते. विनेश फोगाटसंदर्भातील दावा फेटाळण्यात आला. भारतात आल्यावर विनेशचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. यानंतर रेल्वेतील नोकरीचा राजीनामा देऊन विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी विनेश फोगाटला उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, यातच विनेश फोगाटने केलेले आरोप ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी खोडून काढले आहेत. तसेच कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपील करण्यात आले होते, तेव्हा नेमके काय घडले, हेही सविस्तरपणे सांगितले.
आमचे वकील आधीच त्या निर्णयाबाबत उदासीन दिसत होते, असा आरोप विनेश फोगाटने केला होता. या निर्णयाविरोधात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि विनेश फोगट यांनी अपील केले होते. हरीश साळवे यांनी त्यांची बाजू मांडली होती. परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली आणि विनेशला पदक न घेता परतावे लागले होते. हरयाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट जुलाना मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून रिंगणात उतरली आहे. यावेळी एका भाषणात विनेश फोगाटने भारत सरकार आणि पी. टी. ऊषा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पॅरिसमध्ये आजारी पडल्यानंतर पीटी ऊषा भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी विना परवानगी घेत फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले, असा अरोप केला होता.
विनेश फोगाटने निर्णयाविरोधात आव्हान देण्यास नकार दिला
हरिश साळवे यांनी सांगितले की, आम्ही त्या निर्णयाला आव्हान देण्याबाबत सांगत होतो. परंतु, विनेश फोगटला कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने दिलेल्या निर्णयाला आव्हान द्यायचे नव्हते. आम्हाला अपील दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही जोरदार संघर्ष केला. पण आमचे अपील फेटाळण्यात आले. लवादाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आम्ही स्वीस न्यायालयात आव्हान देऊ शकतो, असे मी त्यांना सांगितले. पण विनेश फोगाटने त्याला प्रतिसाद दिला नाही. नंतर तिच्या वकिलांनी मला सांगितले की, तिला पुढे जायचे नाही. विनेश फोगाटने निर्णयाविरोधात आव्हान देण्यास नकार दिला, असा मोठा खुलासा हरिश साळवे यांनी केला.
दरम्यान, हरिश साळवे यांनी असा आरोप केला की, विनेश फोगटच्या वकिलांमध्ये समन्वयाचा अभाव होता. कारण काही वकिलांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नियुक्त केलेल्या अधिक चांगल्या लॉ फर्मला सांगितले की, आम्ही कोणतीही माहिती तुमच्यासोबत शेअर करणार नाही. भारत सरकारची यात कोणतीच भूमिका नाही. कारण भारतीय ऑलिम्पिक संघटना ही भारत सरकारपासून वेगळे आणि स्वतंत्रपणे काम करते. सरकारने हस्तक्षेप केला तर संघटना बाहेर केली जाते, अशी माहिती हरिश साळवे यांनी दिली. ते टाइम्स नाउशी बोलत होते. हरिश साळवे यांच्या दाव्यानंतर खळबळ उडाल्याचे चित्र आहे. विनेश फोगाट आता खोटे बोलल्याचा आरोप करण्यात येत आहे.