बेळगाव : जमिनीच्या वादातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते गणपतराव लक्ष्मण पाटील (८०) यांची वीस ते पंचवीस तरुणांनी तलवार आणि तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या केली. या हल्ल्यात त्यांचा मुलगा संजयही जखमी झाला आहे. खानापूर तालुक्यातील जळगा गावातील शेतवडीत रविवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुरव गटाच्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. भूविकास बँकेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर पाटील यांचे ते वडील होते. घटनास्थळी तेरा दुचाकी वाहने सापडली आहेत. त्याआधारे हल्लेखोर हे बेळगाव आणि अनगोळ परिसरातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.गणपतराव पाटील आणि गुरव कुटुंबीयांत गेल्या तीस वर्षांपासून जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. जमिनीचा ताबा पाटील यांच्याकडे होता. त्यांच्या ताब्यात असलेल्या शेतातील भात कोणीतरी येऊन कापत आहे, असे समजल्यावर गणपतराव आणि त्यांची दोन मुले मुरलीधर आणि संजय शेतात गेले. या वेळी गुरव आणि पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. गुरव यांच्यासमवेत वीस पंचवीस तरुणही होते. मुरलीधर तातडीने पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी त्वरेने घटनास्थळी येऊन दोन्ही गटांची समजूत काढली आणि दोन्ही बाजूंना कागदपत्रे घेऊन पोलीस स्थानकात येण्यास सांगितले होते. पोलीस निघून गेल्यावर कागदपत्रे आणण्यासाठी मुरलीधर पाटील खानापूरला गेल्यावर गुरव गटाने पुन्हा वाद काढला. त्या वेळी गणपतराव यांनी आपल्या बंदुकीतून दोन गोळ्या हवेत उडवल्या. त्यामुळे गुरव आणि समर्थकांनी तलवारी आणि इतर हत्यारे घेऊन गणपतराव व संजय यांचा पाठलाग केला आणि गणपतराव यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. त्यात गणपतरावांचा जागीच मृत्यू झाला. संजय यांच्यावरही हल्ला झाला, पण त्याने जखमी अवस्थेत पळून जाऊन आपला जीव वाचविला. या प्रकरणाची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली आहे. (प्रतिनिधी)
जमिनीच्या वादातून ज्येष्ठ नेत्याची हत्या
By admin | Published: November 23, 2015 2:03 AM