दिसपूर: अलीकडे झालेल्या ५ राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झालेला पाहायला मिळाला. यानंतर पक्षात चर्चेच्या लागोपाठ फेऱ्या झाल्या. काँग्रेसला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासंदर्भात खूप मंथन झाले. यातच काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. तब्बल ४५ वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाला रामराम करताना या नेत्याने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले असून, पक्षातील ज्येष्ठ नेते भाजपशी हातमिळवणी केल्याचा मोठा आरोप केला आहे.
काँग्रेसचे आसाममधील ज्येष्ठ नेते रिपन बोरा यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच बोरा यांनी अभिजित बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९७६ पासून अर्थात गेल्या ४५ वर्षांपासून पक्षासोबत असलेल्या रिपन बोरा यांनी पक्षातील अव्यवस्थेचे कारण पुढे करत राजीनामा दिला आहे.
सोनिया गांधी यांना पत्र लिहित व्यक्त केली नाराजी
भाजपतर्फे सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्या भूमिका मांडल्या जात आहेत. त्यासाठी लढा देण्याऐवजी आणि एकत्रपणे भाजपला रोखण्याऐवजी या सर्वांत जुन्या पक्षातील लोक स्वार्थासाठी एकमेकांसोबतच भांडत आहेत. यामुळे भाजपला प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेण्याची संधी मिळाली आहे. शिवाय, यामुळे लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांचं देखील मनोधैर्य खच्ची होत आहे, असे बोरा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मला हे सांगताना फार दु:ख होत आहे की, भाजपविरोधात लढण्याऐवजी आसाममध्ये पक्षाच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली आहे, असा दावाही बोरा यांनी केला आहे.
दरम्यान, ५ राज्यांतील निवडणुकांमध्येही काँग्रेसची वाताहात झालेली पाहायला मिळाली. पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदावर असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद समोर आला आणि परिणामतः पंजाब राज्य काँग्रेसच्या हातून केले.