नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिल्याचे वृत्त फेटाळून लावले. कार्यकर्ते म्हणाले तर तेही निवडणूक लढवू शकतात. आपले वय ८३ असल्याचे सांगून त्यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत दिले.
सोनिया गांधी, ते आणि इतर अनेक ज्येष्ठ नेते निवडणूक लढवत नाहीत, असे विचारले असता, खरगे म्हणाले, ‘नाही, आम्ही माघार घेत आहोत हे चुकीचे आहे. माझे वय ८३ आहे, तुम्ही ६५ व्या वर्षी निवृत्त होता. मी ८३ वर्षांचा आहे... तुम्ही मला संधी दिली तर... सर्व म्हणतील तर, मी नक्की लढेन.’ काँग्रेसमध्ये एका जागेवर तिकिटासाठी १० दावेदार आहेत, असेही ते म्हणाले.
‘जल, जंगल, जमीन’ यांचे रक्षण करणार
आम्ही आदिवासींच्या हक्कांचे आणि त्यांच्या ‘जल, जंगल, जमीन’चे संरक्षण ‘आदिवासी ठराव’च्या हमीद्वारे करू. वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय अभियान स्थापन केले जाईल, विशेष बजेट ठेवण्यात येईल आणि विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, असे खरगे म्हणाले.