मुंबई : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता केली आहे. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार नाही, अशी ठाम भूमिका सीबीआयने उच्च न्यायालयात सोमवारी घेतली.कनिष्ठ अधिका-यांच्या आरोपमुक्तीच्या आदेशाला सीबीआयने आव्हान दिले आहे. मात्र वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नाही, असे अॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग व संदेश पाटील यांनी सीबीआयतर्फे न्या. रेवती मोहिते-डेरे यांना सांगितले.सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी २०१६ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरातचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक डी.जी. वंजारा, राजस्थानचे आयपीएस अधिकारी दिनेश एम.एन. आणि गुजरातचे आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांची आरोपातून मुक्तता केली. त्यांच्यावर खटला भरण्यासाठी सीबीआयने पूर्वमंजुरी घेतली नसल्याने विशेष न्यायालयाने या तिघांना आरोपमुक्त केले.या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. दिनेश एम.एन. व पांडियन यांना नोटीस पाठवली असून वंजारा यांनाही नोटीस पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधू शकत नसल्याचे शेख याचे वकील गौतम तिवारी यांनी न्यायालयाला सांगितले. याआधीही न्यायालयाने सीबीआयला वंजारा यांच्या ठावठिकाण्याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. परंतु, सीबीआयने चुकीचा पत्ता दिल्याची बाब तिवारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली.सीबीआय ही महत्त्वाची तपास यंत्रणा आहे. त्यांना प्रतिवाद्यांचा पत्ता मिळवण्यास काहीही अडचण यायला नको. आम्ही अनेक वेळा तपास यंत्रणेलाच नोटीस बजावण्यास सांगतो, त्यामुळे याही केसमध्ये सीबीआयने प्रतिवाद्यांना नोटीस बजावावी. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीला विलंब होणार नाही, असे न्या. डेरे यांनी सांगितले. या प्रकरणात ३८ जण आरोपी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व अन्य १४ आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता करण्यात आली आहे.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कौसर बी हैदराबादवरून सांगलीला येत असताना गुजरातमध्येच गुजरात एटीएसने त्यांना ताब्यात घेतले. शेखची हत्या करण्यात आली. मात्र तो चकमकीत मारला गेल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर त्याची पत्नी गायब झाली. या घटनेचा तुलसीराम प्रजापती हा एकच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. त्याचीही पोलिसांनी हत्या केली.
वरिष्ठ अधिका-यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 11:34 IST