राहुल गांधी यांच्या उमेदवारीला ज्येष्ठ नेत्यांचे अनुमोदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:33 AM2017-12-05T04:33:47+5:302017-12-05T04:34:02+5:30
राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीबाबत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते काँग्रेसचे लाडके नेते आहेत, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीबाबत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते काँग्रेसचे लाडके नेते आहेत, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे, तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंंग यांनी राहुल गांधी यांचे अभिनंदन करताना, ते देशाचे भावी पंतप्रधान आहेत, असे म्हटले आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मनमोहन सिंग म्हणाले की, सोनिया गांधी यांनी १९ वर्षे देशाची सेवा केली आहे. राहुल गांधी पक्षाच्या महान परंपरा पुढे चालवतील याची खात्री आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सदस्य केवळ राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून हे स्पष्ट दिसते की, राहुल गांधी पक्षाध्यक्ष होत असल्याने ते घाबरलेले आहेत.
‘औरंगजेबी राज’
धरमपूर (गुजरात) : राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर टीका करताना हे तर ‘औरंगजेबी राज’ असल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष दिवाळखोर झाला आहे. जी व्यक्ती सध्या जामिनावर आहे, तिला काँग्रेस अध्यक्ष करीत आहे. एका परिवाराचे राजकारण स्वीकारायचे का, हा काँग्रेसचा निर्णय आहे. मात्र आम्हाला हे औरंगजेब शासन नकोय.
काँग्रेसचे ‘पिढीकरण’ पूर्ण
राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड होत असताना भाजपाचे प्रवक्तेजी.व्ही.एल. नरसिंह राव यांनी यानिमित्ताने काँग्रेसचे ‘पिढीकरण’ पूर्ण होत असल्याची टीका केली आहे. भाजपाने यासाठी आज ‘पिढी’ आणि ‘पेडी’ असे शब्द वापरले. पेडी हे राहुल गांधी यांच्या पाळीव कुत्र्याचे नाव आहे.