नवी दिल्ली/ राळेगणसिद्धी: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
दिल्लीत मंगळावारी घडलेल्या हिंचाराबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अण्णा हजारे या घटनेबाबत म्हणाले की, दिल्लीत जे घडलं ते नक्कीच क्लेशदायक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी आहे, असं अण्णा हजारे यांनी सांगितलं.
प्रजासत्ताक दिनी प्रजेची सत्ता आली. प्रजा मालक झाली. मात्र अशा पवित्र दिवशी आपणच धूडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणं, पूर्णपणे चूकीचं आहे, असं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. मी ४० वर्षे आंदोलन करीत आहे. आंदोलन म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह हा शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने करावा लागतो. हिंसेमुळे आंदोलन बदनाम होते. गालबोट लागतं, असं अण्णा हजारे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
तत्पूर्वी, येत्या ३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्या, अशी प्रमुख मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. मात्र मागणीवर केंद्र सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या आंदोलन जवळ आलेले असताना दिल्लीत हिंसाचार झाल्याने अण्णा हजारे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अण्णा हजारे यांच्याकडून कृषी मंत्र्यांना आज (२७ जानेवारी) उत्तर पाठविले जाण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांनी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले असले तरी पूर्वी एकदा निघाला तसा ऐनवेळी तोडगा निघून उपोषण स्थगित होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. याशिवाय दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर सर्वच पातळ्यांवर सावध पावले टाकली जात आहेत.
अण्णा हजारे काय म्हणाले?
२०११ मध्ये मी उपोषणाला बसलो. त्यावेळी माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांबाबत पत्र पाठविले. त्याचे उत्तरही दिले जात नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांचे शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे व कौतुकाचे व्हिडिओ जनतेला दाखविणार आहे, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक पत्रे लिहिली. मात्र एकाही पत्राचे उत्तर अजूनही पंतप्रधान मोदी यांनी दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत असा आरोप अण्णा हजारे यांनी केला.