ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि १७ - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अशोक सिंघल यांचे मंगळवारी दु:खद निधन झाले, ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सिंघल यांच्यावर गुडगावमधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान आज त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
श्वास घेण्यात त्रास होत असल्याने सिंघल यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती अधिकच बियघडल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वीच भाजप अध्यक्ष अमित शहा, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह इतर नेत्यांनी इस्पितळात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
अशोक सिंघल यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२६ साली आग्रा येथे झाला होता. त्यांचे वडिल सरकारी अधिकारी होते. सिंघल यांनी १९५० साली वाराणसी हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथून मेटलर्जिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. १९४२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले सिंघल पदव्युत्तर शिक्षणानंतर संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले आणि त्यांनी दिल्ली व हरियाणाचे प्रांत प्रचारक म्हणून काम केले. १९८० साली त्याची विश्व हिदू परिषदेचे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर १९८५ साली ते विहिंपचे सचिव बनले आणि २०११ पर्यंत त्यांनी विहिंपचे अध्यक्षपद भूषवले. राम मंदिर आंदोलनात अशोक सिंघल यांचा सक्रिय सहभाग होता.
दरम्यान अशोक सिंघल यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन मला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.