अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबादेतील सामान्य रुग्णालयात गेल्या 24 तासांत 9 लहानग्यांचा मृत्यू झाल्यानं गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सर्व मुलांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालय प्रशासनानं लहानग्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.पाच लहानग्यांना बाहेरच्या रुग्णालयातून अहमदाबादेतल्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तर इतर चार मुलं येथेच जन्मली होती. मुलं शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त होती. तसेच त्यांना भयंकर आजारानं पछाडलं होतं, अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. दुसरीकडे या मुद्द्यावरून गुजरातमध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं गुजरात सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारनं एकतर या घटनेला डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं मान्य करावं, अन्यथा मुलांच्या आई कुपोषित होत्या का ते सांगावं, असं ट्विट करत काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल यांनी गुजरात सरकारला लक्ष्य केलं आहे.चिमुकल्यांची प्रकृती जास्ती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या वतीनं त्या बाळांना वाचवण्यासाठी सर्व उपाय योजण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचं विरोध प्रदर्शन करण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.
गुजरातमधील सामान्य रुग्णालयात 24 तासांत 9 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 7:26 AM