मुंबई- केंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सकाळी शेअर बाजारात चांगलीच उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजार खुला होताच सेन्सेक्स 150 आणि निफ्टी ५० अंकांनी वधारला .त्यामुळे सेन्सेक्स ३६,१२७.२० च्या पातळीवर जाऊन पोहोचला तर निफ्टीने ११,६०७.२५ ची पातळी गाठली. ही आकडेवारी अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वीची आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात नेमकी काय घडामोड घडते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुरूवातीच्या काही तासात एकाबाजूला टीसीएस, अदानी पोर्ट्स आणि हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, येस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक, अॅक्सिक बँकेचे शेअर वाढून कारभार करत होते. तर सनफार्मा, मारूती, डॉक्टर रेड्डी भारती एअरसेल, एनटीपीसीच्या शेअर्स कोसळले होते.
याआधी बुधवारी शेअर बाजारावर बजेटचा ताण स्पष्टपणे पाहायला मिळाला. सेन्सेक्स 69 अंकावरून तुटून 36,000 अंकाच्या खाली बंद झाला. तर निफ्टीमध्ये 22 अंकांच्या घसरणीनंतर निफ्टी 11,027 वर बंद झाला.